ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण जाहीर

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना गुरुवारी महाराष्ट्राचा सर्वेच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला. सन 2020च्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आशाताईंना गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

आशा भोसले हे नाव जुन्या पिढीपासून सध्याच्या तरुण पिढीपर्यंत प्रत्येकाला माहीत आहे. चिरतरुण, चतुरस्र पार्श्वगायिका म्हणून त्यांची ख्याती आहे. एक हजारांपेक्षाही जास्त चित्रपटांमधील गाण्यांना आशाताईंचा स्वर लाभला आहे. 1947 पासून आशाताईंच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. आशाताईंनी नवी संस्कृती, नवे गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्याशीही सूरांचे नाते निर्माण केले.

त्यामुळे प्रत्येक पिढीला त्या जवळच्या वाटतात. वयाच्या साठीमध्येही ‘रंगीला’, ‘ताल’ अशा चित्रपटांमध्ये आशाताईंनी गायलेल्या गाण्यांनी तरुण पिढीलाही मोहून टाकले. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत 20 भाषांमधील 12 हजारांवर गाणी गायल्याचा विश्वविक्रमही आशाताईंच्या नावे नोंद आहे.

कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱया आणि त्या माध्यमातून मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱया व्यक्तीला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. आशाताईंनी पार्श्वगायन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने केला जाणार आहे. दहा लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Post a Comment

Previous Post Next Post